Bookmark and Share

 

गोरेगाव नाट्यगृहाची दुसरी घंटा

पश्चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता बोरिवली आणि विलेपालेर्नंतर आता गोरेगावात नाट्यसंकुल उभारण्याचा प्रकल्प लवकरच साकारणार आहे. प्रशासकीय अडथळे दूर झाल्याने आता दुसरी घंटा आता झाली आहे.


मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगतच्या मंडईच्या जागेत हे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सुभाष देसाई यांनी सर्वप्रथम या नाट्यगृहाचा प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते. मात्र पालिकेच्या तांत्रिक बाबींमध्ये काही काळ हा प्रकल्प अडकला होता. देसाई यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची तसेच संबंधित अधिकाऱ्यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यावेळी प्रशासकीय अडथळ्यातील बाबींबाबत विचारविनिमय होऊन त्या दूर करण्यात आल्याचे देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


मंडईच्या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांना नव्या नाट्यसंकुलात दीनानाथ नाट्यगृहाच्या धतीर्वर जागा दिली जाणार असून एक बॅक्वेट हॉलदेखील तयार केला जाईल. देसाई यांनी वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला होता. त्यानुसार आठशे आसन क्षमतेच्या नाट्यगृहाचा संकल्पित आराखडा तयार झाला आहे.


सदर जागा मंडई राखीव क्षेत्र असून तेथे उभारण्यात येणाऱ्या ऑडिटोरिअमचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनी दिली. तर मुंबई पालिकेच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प विनासायास पार पडेल आणि पश्चिम उपनगरातील नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.


Source : Maharashtra Times

आपला अभिप्राय - Leave a Reply

  

Banner Advertisement